क्रित्येकदा मनात अनेक प्रश्न घोंघावत असतात. काही प्रश्न सहज सोपे असतात. तर काही कठीण असतात. काही प्रश्नाची उत्तरे माहित असून सुद्धा ते प्रश्न म्हणूनच राहतात. तर काहींची उत्तरेच सापडत नाहीत. काही प्रश्न सोडवल्यावर त्यांची उत्तरे सापडतात. तर काही प्रश्न सोडवत जाताना त्या अनुषंगाने अनेक प्रश्न उभे राहतात. काही प्रश्नांची उत्तरे शोधण्यात आनंद मिळतो तर काही प्रश्नांची उत्तरे सोडवताना मनाला क्लेश होत राहतात. काहींची उत्तरे चुटकीसरशी मिळतात. तर काहींची उत्तरे शोधत अख्खे आयुष्य घालवावे लागते. काही प्रश्न आयुष्यातल्या चांगल्या आठवणी डोळ्यासमोर आणतात तर काही प्रश्न आयुष्यातल्या दु:खद प्रसंगांची आठवण करून देतात. काही प्रश्नांची उत्तरे माहित असतात पण त्याने मानसिक समाधान होत नाही तर काहींची उत्तरे माहित नसल्यामुळेच मानसिक समाधान मिळते. मी तर कधी कधी तर उत्तर मिळवण्याच्या नादात प्रश्न काय असतो तेच विसरून जातो.
असे अनेक बरे वाईट प्रश्न मनाच्या पातळीवर चांगल्या आणि वाईट मनाशी युद्ध करत असतात. रोजच्या धकाधकीच्या जीवनात काहींची उत्तरे मिळतात. तर काही अनुत्तरीतच राहतात. असाच एकदा विचार करत असताना परत एक प्रश्न मनात उभा राहिला (पुनः प्रश्न). अश्या अनुत्तरीत प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळणारच नाहीत का? असे प्रश्न माझ्यासारख्या अनेकांना पडत असतील. काहींनी त्यावर उत्तरे शोधायचा प्रयत्नही केला असेल तर काहींनी उत्तरे मिळवली सुद्धा असतील. मग विचार केला असे मनात उद्भवणारे प्रश्न ब्लॉगवरच का टाकू नये. कदाचित समविचारी कोणी असेल तर त्यांची उत्तरे तर मिळतील. काहींची उत्तरे शोधण्यात मदत तरी होईल.
म्हणूनच ब्लॉग वर एक नवीन सदर चालू करायचा विचार केला "असं का?". ह्या अनुषंगाने मनात येणारे सगळे प्रश्न निदान लिहून तरी ठेवता येतील. इतरांकडून उत्तरे मिळो अथवा न मिळो. कधीतरी आयुष्याच्या संध्याकाळी निवांत बसून परत तेच प्रश्न वाचून त्यांची उत्तरे भेटली कि नाही हे तर बघता येईल.
त्याबरोबर अजून एक सदर चालू करायचा विचार आहे. "रसग्रहण"
ह्यात ज्या ज्या गोष्टी आवडतात, नावाडतात, मनाला भावतात किंवा भयंकर डोक्यात जातात. त्या सर्वांचे रसग्रहण करायचा विचार आहे. ह्यात खाद्य पदार्थ, एखादे हॉटेल, एखादा कार्यक्रम, प्रेक्षणीय स्थळ, चित्रपट, नट नटी, पुस्तके, खेळाडू इ. कश्या कश्यावरही विवेचन करायचे आहे. मराठी माणसाचा गुणधर्मच आहे ना! नाही म्हटले तरी आपले मत मांडणारच. 'रसग्रहण' ह्या सदरा खाली हेच विवेचन करायचे आहे.
0 comments:
Post a Comment