पावसाळी सहल- भिवपुरी


गेल्या आठवड्यातली एक सुट्टी आधीच वाया गेलेली असते. ह्या शनिवारी तरी नक्की जायचे असे ठरत होते. कुठे जायचे माहित नाही पण घरातून निघायचे. अश्यातच एक वर्षांपूर्वी एका मित्राने पोस्ट केलेला बेकरे गावाचा निसर्गरम्य फोटो आठवतो. चक्क शोधल्यावर सापडतो सुद्धा. फोटो बघून दोन डोकी अजून तयार होतात. 30 जणांच्या ग्रुप मधून फक्त 4 जण यायला तयार होतात. ट्रेनचे टायमिंग ठरवून नशिबाने तीच ट्रेन भेटते आणि पकडली जाते. पुढे 4 तासांचा मेगाब्लॉक असल्याने ट्रेन मध्ये भयंकर गर्दी.... एकतासाचा प्रवास भयंकर गर्दीत दरवाज्यात लोंबकळून होतो. त्यात चार पैकी एक जण दुसऱ्याच स्टेशन वर उतरतो... मग मी नाही आता येणार...मी घरी जातो....असे खोटे राग देऊन अर्ध्या तासा नंतरची शेवटची ट्रेन पकडून गपचूप पुढे येऊन भेटतो...पोटपूजा करून दुनियेच्या म्हणजेच गर्दीच्या उलटे जाऊन आम्ही वेगळाच रस्ता पकडतो....

रिक्षावाला सुद्धा अचंबित होऊन विचारतो....बाकीचे तिकडे चालले आहेत तुम्ही लोक इकडे कुठे चालला आहेत....आम्ही- 'बेकरे गावात जायचे आहे तिथे पण एक धबधबा आहे का?' असे त्यालाच विचारतोय ...तो म्हणतो, आहे...पण लोक खूप कमी असतील....आम्ही म्हटले आम्हाला कमीच गर्दी पाहिजे.

3 किमी आणि 4 माणसे घेऊन तो आम्हाला बेकरे गावात सोडतो आणि 100 ची नोट घेऊन निघून जातो. गावातले काही वयस्क माणसे आम्हाला विचारतात ...काय हो? मोठ्या धबधब्यावर का नाही गेलात?..आम्ही म्हणतो... आम्हाला गर्दी नकोय...ते मान डोलावून हसतात...आम्ही दुतर्फा असलेली घरे बघत पुढे चालत राहतो..







घरांची रांग संपून शेतजमीन चालू होते. आम्ही तिथलीच एक पायवाट पकडून जंगलात घुसायला लागतो...ह्या पायवाटांचे एक बरे असते त्या तुम्हाला कुठे ना कुठे आणून सोडतात ... आजूबाजूचे निसर्ग सौंदर्य डोळ्यात आणि कॅमेरात साठवत आम्ही पुढे चालू लागतोय.











पुढच्याच वळणावर एक अंदाजे 10/12 वर्षाचा मुलगा आम्हाला सोबत करतो.... त्याला विचारल्यावर तो म्हणाला मी तुम्हाला धबधब्यावर नेऊन सोडतो..... सह्याद्रीत फिरताना असे वाटाडे तुम्हाला खूप भेटतात...ते तुम्हाला सरकारी गाईड सारखी पैशाची घासाघीस करत नाही....किंवा जबरदस्ती सुद्धा करत नाही ....तुम्हीही त्यांना 'किती घेणार' असे विचारून अपमानित करायचे नसते... उलट तुम्ही त्याला जवळ घेऊन खुलवायचे... त्याला आजूबाजूची जुजबी माहिती विचारायची....आपल्यातला खाऊ त्याला द्यायचा....दोन चार फोटो त्याच्याबरोबर काढायचे...मग साहेबांची कळी खुलते मग ते तुम्हाला जंगलातील वेगवेगळी गुपित खुलून दाखवणार... मध्येच एखादे वेगळेच रानफुले दाखवतील.... मध्येच एखाद्या झाडाच्या पानाचा गुणधर्म सांगतील..... मध्येच कुठल्याश्या आडवाटेने घेऊन जातील...मध्येच एखाद्या झुडुपातून दरीच्या टोकावर आणून उभे करतील...निसर्गाचे वेगळेच रूप तुम्हाला दाखवतील....मग तुम्हाला खऱ्या अर्थाने निसर्गात आल्यासारखे वाटेल.












पायवाटेवरून पुढे चालत असताना भर जंगलात उभारलेली एक झोपडी दिसतेय.आम्ही आमच्या गाईड ला विचारतोय तर तो म्हणतोय की गुरे शेतात घुसू नये म्हणून उभारलेली झोपडी आहे.पावसाळ्यात गुरे इथे बांधतात. पण आम्हाला तिथे गावठी दारूचा वास येतोय. वाटेत एक बाईकवाला गाडीवर मोठ्या पखालीतून गावठी दारू घेऊन जाताना दिसतोय आणि आमचा संशय खरा होतोय. आम्ही पुढे चालत धबधब्यावर पोचलोय. तिथे तर मोठी शेकोटी लावून मोठमोठ्याला पिंपात गावठी दारू बनवणे चाललेय. आम्ही तिकडे दुर्लक्ष करून निसर्गाचे अदभुत रूप पाहण्यात गुंग झालो. मोठ्या कातळावरून शुभ्र पाण्याचा धबधबा आपल्याच मस्तीत खाली कोसळतोय. काही हौशी ट्रेकर्स मोठाले दोरखंड बांधून तो धबधबा उतारताहेत. त्यांचे काही मित्र त्यांना चिअर अप करताहेत.






आमचा गाईड सांगतोय आपण अजून वर जाऊया तिथे पाणी खूप आहे आणि तिथे तुम्हाला चांगले खेळायला मिळेल. आम्ही त्याच्यामागे गुमान चालत तो डोंगर चढलोय. आता त्या धबधब्याच्या वर येऊन अजून स्वर्गाच्या जवळ पोचल्या सारखे वाटतेय. तिथेच आलेल्या एका गावकऱ्या कडे जेवणाची ऑर्डर करून आम्ही त्याहून वरच्या छोट्या धबधब्याकडे गेलो. कपडे बदलून तिथल्या थंडगार पाण्यात मस्त डुंबून घेतले. मध्येच येणारी पाऊसाची झड म्हणजे गरम गरम वरण भातावर साजूक तूप टाकल्यासारखे होते. जास्तीत जास्त दोन माणशी म्हणजे जवळपास 12 फुटाचा तो धबधबा होता पण त्याचा आवेग इतका होता की त्या पाण्यासमोर उभे राहवत नव्हते. मध्येच आलेला पाऊस त्याचा जोर वाढवायला अजून मदत करत होता.





मनसोक्त डुंबून आणि खेळून झाल्यावर आम्ही बाहेर आलोय. सपाटून भूक लागली होती. मगासचा गाववाला येऊन जेवणाचे डबे ठेवून गेला होता पण आता त्याची बायको आणि मुलगी तिथे होती आणि आमचा भाजी भाकरी चा 90 रुपयेचा ठरलेला रेट तिला कमी वाटत होता. पण नंतर ती तयार झाली आणि आम्हाला दोन दोन भाकरी आणि दोन भाज्या दिल्या वर आम्ही डाळ भात हि मागून घेतले आणि तिने हि कुठेही कमीपणा न करता आम्हाला पोटभर वाढले. वर तोंडी लावायला एक पापड आणि लोणचे पण दिले.


तांदळाच्या मऊ भाकऱ्या...चण्याची उसळ आणि बटाट्याची कांद्यात परतुन केलेली भाजी....म्हणजे तुम्हाला शब्दात काय सांगावे. ती चव सांगण्यापेक्षा अनुभवण्यात खरी मजा आहे. अप्रतिम हा शब्दही फिका वाटतोय त्या जेवनापुढे.गावच्या पाण्यात आणि चुलीवर बनवलेल्या जेवणाची चव निव्वळ माईंड ब्लोविंगचं.  त्या जेवण बनवणाऱ्या मावशीचे कौतुक केल्यावर ती पण नवीन नवरी सारखी लाजली. आवडला ना तुम्हाला ..... घ्या की अजून असे आवर्जून म्हणाली

आम्ही शारीरिक आणि आत्मिक समाधानाने त्या जागेचा निरोप घेऊन परतीला उतरू लागलो. वाटेत येणाऱ्या ओढ्यात उतरून...बांधावर चढून...शेतात घुसून...काही फोटो काढले आणि पुढे एका ठिकाणी बांध घालून पाणी अडवलेल्या छोटेखानी ओढ्यावर आलो. परत डुंबायाचा मूड झाला म्हणून बॅगा टाकून पाण्यात उतरलो. यथेच्छ तासभर पाण्यात डुंबून आजूबाजूचे सौंदर्य डोळ्यात साठवून आम्ही परत धकाधकीचे जीवन जगण्यास रेल्वे स्टेशन वर आलो.
















एकंदरीत आजचा दिवस सार्थकी लागल्या सारखा झालाय.....ह्या दिवसाच्या आठवणींवर पुढचे काही दिवस घालवायचे आहेत आता.

बोला!!! ठ्ठलवि ठ्ठलवि ठ्ठलवि ठ्ठलवि!!

(टीप: सर्व फोटो रेड्मी नोट ३ ह्या मोबाईलने काढलेले आहेत. DSLR ची क्वालिटी ह्या फोटोंना नाही.)

CONVERSATION

1 comments:

  1. Thanks for sharing this information giostar is one of the best stem cell therapy in India. GIOSTAR has a capacity to treat a few destroying Immunological infirmities and Blood related infections. These unite Diabetes Type I and Type II, Lupus, Multiple Sclerosis, Crohn's burden, Vasculitis, Scleroderma, Myasthenia Gravis, Sickle Cell Anemia, Leukemia, Lymphoma, Thalassemia and building up the treatments for Alzheimer's, Autism, Anti-Aging Treatments, Parkinson's infection, Cancer, Heart and Retinal Degeneration, Amyotrophic Lateral Sclerosis, Neuropathy, Osteoarthritis, Paralysis, Strokes, Spinal Cord Injuries, Skin Burns and Spinal Muscular Atrophy (SMA). best stem cell therapy in indiaLeukemia Treatment in India Best Diabetes Hospitals in India

    ReplyDelete

Back
to top