ह्या गोष्टी करायच्या बाकी आहेत..

लहानपणी शाळेत चांगले मार्क मिळाले पाहिजे म्हणत बालपण गेले, हायस्कूल मध्ये वयाची १५ वर्षे गेली. चांगली नोकरी लागली पाहिजे म्हणून चांगला अभ्यास करायचा असे करत कॉलेजची पाच वर्षे संपली. पुढे चांगले करियर करायचे, सेटल व्हायचे, चांगली नोकरी शोधायची असे करत पुढची काही वर्षे गेली, नोकरीत कायम झाले पाहिजे. पगार वाढला पाहिजे म्हणून खूप काम करायला पाहिजे असे करत पुढची काही वर्षे गेली, लग्न करायचे, घर घ्यायचेय, सेटल व्हायचेय करत अर्धे आयुष्य संपून सुद्धा गेले. एक दिवशी शांत डोक्याने विचार करत बसलो तेव्हा समजले कि सगळे केले....शिक्षण झाले, कॉलेज झाले, नोकरी शोधली, जीव तोडून काम केले, घर घेतले, लग्न केले...आयुष्यात ह्या वयापर्यंत करायचे ते सर्व काही केले पण नंतर समजले की ह्या धावपळीत अरे जगायचेच राहून गेले. अरे मी तर प्रोग्राम केलेली मशीन नाही की सकाळी उठायचे, कामावर जायचे, संध्याकाळी घरी यायचे, जेवायचे, झोपायचे, परत सकाळी उठून कामावर जायचे. कधीतरी ब्रेक घेतलाच पाहिजे मला. पण ब्रेक घेतल्यावर करायचे काय? मग एकेक गोष्टी आठवू लागल्या कि आयुष्याच्या धावपळीत ह्या गोष्टी करायच्याच राहून गेल्या आहेत. 


खरच ह्या गोष्टी करायच्याच राहून गेल्या आहेत. परत एकदा करायच्या आहेत.
  1. कागदाची बोट बनवून पाण्यात सोडायची आहे.
  2. रस्त्यात साचलेल्या डबक्यात उड्या मारत एकमेकांवर पाणी उडवायचे आहे.
  3. फुलांवर फिरणाऱ्या चतुर आणि फुलपाखारुंच्या मागे धावत फिरायचे आहे.
  4. पतंग उडवून मित्रांच्या पतंगी काटायच्या आहेत.
  5. ऑफिस च्या कपड्यातच पावसात भिजायचे आहे.
  6. खूप ब्लॉग्स लिहायचे आहेत.
  7. सकाळी पहाटे लवकर उठून बाईक काढून लाँग ड्राईव्ह ला जायचे आहे.
  8. मस्तपैकी गरम गरम भुर्जी- पावचा नाश्ता करायचा आहे.
  9. भर पावसात टपरीवर गरमागरम वाफाळलेला चहा प्यायचा आहे.
  10. किल्ले चढायचे आहेत. कर्नाळा किल्ला परत एकदा सर करायचा आहे.
  11. डोंगरवाटात मार्ग काढत रस्ता हरवायचा आहे आणि परत रस्ता मिळाल्यावर रिलॅक्स व्हायचे आहे.
  12. डोंगरदऱ्यात फोटो काढत फिरायचे आहे.
  13. छोटी छोटी डॉक्युमेंटरी फिल्म बनवायच्या आहेत.
  14. रेसिंग ची कार फुल स्पीड मध्ये चालवायची आहे.
  15. पावसाच्या चिखलात अनवाणी होऊन फुटबॉल खेळायचा आहे.
  16. रिमझिम पावसात गाणी म्हणत पायवाटा तुडवायाच्या आहेत.
  17. मोठ्या धबधब्याखाली मनसोक्त न्हायचे आहे.
  18. खूप खूप फुलझाडे आणि फळझाडे लावायची आहे.
  19. एक मोठ्ठी गॅलेरी असलेला बंगला बांधायचा आहे आणि गॅलेरीतील झोपाळ्यात पुस्तके वाचत लोळत पडायचे आहे.
  20. सकाळी लवकर उठून स्केच काढायच्या आणि ऑईल पेंटिंग करायच्या आहेत.
  21. जलद लोकलच्या दरवाज्यात उभे राहून ऐन गर्दीच्या वेळेला प्रवास करायचा आहे.
  22. मुंबईच्या जुन्या बिल्डिंगी बघत असच रस्त्यावर भटकायचे आहे.
  23. जहांगीर गॅलेरीच्या बाहेर असलेल्या कट्ट्यावर जाऊन बसायचे आहे.
  24. कधीतरी मुद्दाम खिशात फक्त चिल्लर घेऊन फिरायचे आहे आणि भूक लागल्यावर एक रुपयाचे शेंगदाणे खावून राहायचे आहे.
  25. एक रुपयात किती कमी शेंगदाणे दिलेत म्हणून शेंगदाण्यावाल्याकडे कटकटही करायची आहे.
  26. मार्केट मधून जाऊन फळे, फुले, भाजी घ्यायची आहे आणि एवढी भाजी घेतली म्हणून फ्री मध्ये मिरची, कोथिंबीर मागायची आहे.
  27. दुसऱ्याच्या झाडावर चढून आंबे काढायचे आहेत.
  28. दगडी मारून चिंचा, जांभळे काढायची आहेत.
  29. एप्रिल, मे च्या सुट्टीत दुपारी डुलक्या काढायच्या आहेत.
  30. थंडीत सफेद गोधडी घेऊन गच्च झोपायचे आहे.
  31. गरम चहात पारले जी चे बिस्कीट बुडवून खायची आहेत आणि उरलेली चहा बशीत घेऊन फुरके मारत प्यायाचीय.
  32. मनसोक्त ओरडून शिव्या द्यायच्यात. (आयला ह्या कोर्पोरेट वर्ल्ड मध्ये सगळ्या शिव्या मनातच द्याव्या लागतात !!!)
  33. रविवारी कमीत कमी बारा वाजेपर्यंत तरी अंथरुणात लोळत पडायचे आहे आणि जेवल्यावर परत झोपायचे आहे.
  34. परत शाळेत आणि कॉलेजात जायचे आहे.
  35. सुंदर मुलीना बघायचे आहे.
  36. मधल्या सुट्टीत हात गाडीवरचा गरमागरम वडापाव, चिंचा, आवळे, बोरे खायची आहे.
  37. मुसळधार पावसात पप्पांच्या हातच्या कांदा भजी खायच्या आहेत.
  38. कॉलेजात जाऊन लेक्चर बंक करायचे आहेत आणि मॉर्निंग शो चा पहिला शो बघायचा आहे.
  39. कॅम्पस मध्ये दुसऱ्याच्या गाडीवर बसून मित्रांबरोबर चकाट्या पिटायच्या आहेत.
  40. अकाउंट शिकवणाऱ्या मॅडम दिसायला चिकन्या आहेत म्हणून त्यांचे लेक्चर अटेंड करायचे आहेत.
  41. लायब्ररीत जाऊन गपचूप अभ्यास करण्याऱ्या सुंदर मुली बघायच्या आहेत.
  42. केस वाढवून पोनी बांधायची आहे.
  43. मित्रांबरोबर नॉन वेज च्या सीडीज बघायच्या आहेत.
  44. पप्पांकडून परत पॉकेट मनी घ्यायचा आहे. ते जमवून मित्रांना पार्टी द्यायचीय.
  45. मित्राबरोबर एकदा शोले बघायचा आहे. आणि सगळे डायलॉग परत मोठ्या आवाजात म्हणायचे आहेत.
  46. एका सुंदर संध्याकाळी  मित्रांबरोबर जुन्या गझल ऐकायच्या आहेत. 
  47. जिम मध्ये जाऊन बॉडी बनवायची आहे.
  48. गणपती मंडळात रात्र जगवायची आहे.
  49. गणपती विसर्जनामध्ये ढोल ताश्यावर नाचायचे आहे.
  50. मित्रांच्या लग्नात धावपळ करायची आहे.
  51. लुज मोशन झाले आहे सांगून  ऑफिसला दांडी मारायची आहे आणि बायकोला घेऊन फिरायला जायचे आहे.
  52. आई वडिलांना पंढरपूर, गाणगापूरचे दर्शन करून आणायचे आहे.
  53. लहान मुलांबरोबर लपाछपी, गोट्या, कोयबा, सोनसाखळी खेळायचे आहे.
  54. क्रिकेट खेळून काचा फोडायच्या आहेत.
  55. गावाच्या घरात जाऊन सुस्तावलेल्या दुपारी वरांड्यात लोळायचे आहे.
  56. ओढ्यात उतरून म्हशीना अंघोळ घालायची आहे.
  57. विहिरला घागर लावून पाणी काढायचे आहे.
  58. एक दिवस अंघोळ न करता असेच अंथरुणात लोळत पडायचे आहे.
  59. लता किशोरची क्लासिक गाणी मोठ्या आवाजात लावून माझ्या भसाड्या आवाजात म्हणायची आहे.
  60. बाईकला चांगली धुवून सजवायची आहे.
  61. मुसळधार पावसात नरीमन पॉइंटला जाऊन अंगावर लाटा घेत अमिताभ सारखे रिम झिम गिरे सावन गाणे म्हणत बायकोबरोबर भिजायचे आहे.
  62. घरात रद्दी खूप झालीय. एका दिवशी सगळी बसून इंग्लिश आणि मराठी पेपर वेगळे काढायचे आहेत. तेव्हढेच किलोमागे आठ आणे जास्त मिळतील.
  63. भारत दर्शन करायचे आहे.
  64. जंगल सफारीत जाऊन वाघाचे फोटो काढायचे आहे.
  65. जुने पेपर,बिले, सर्टिफिकेट काढून नीट फायलिंग करायची आहे.
  66. दिवाळीत ताज महालच्या लवंगी माळा वाजवायच्या आहेत. 
  67. थर्टी फर्स्ट ला रात्री फिरायचे आहे.
  68. वर्ल्डकप जिंकल्यावर परत एकदा फटाके फोडायचे आहेत आणि बाईक वर झेंडे घेऊन फिरायचे आहे.
  69. सारे जहांसे अच्छा गाणे अंगावर काटा येईपर्यंत म्हणायचे.
  70. जुहू बीचच्या वाळूत बसून सूर्यास्त बघायचा आहे.
उफ्फ्फ !!!!हे भगवान !! अश्या गोष्टी आठवत बसलो तर कधीच संपायच्या नाहीत. काही तरी बाकी ठेवल्या पाहिजेत पुढचा ब्लॉग लिहिण्यासाठी....खरच ! किती गोष्टी करायच्या बाकी आहेत....परत एकदा जगायचे आहे.
आपल्याच धुंदीत फिरायचे आहे....
मदमस्त होऊन जगायचे आहे....
बेधुंद वाऱ्यातही स्थिर राहायचे आहे....
परत एकदा भोवरा व्हायचे आहे....
परत एकदा भोवरा व्हायचे आहे....




DSCN2716-2



CONVERSATION

12 comments:

  1. अतिशय सुंदर पोस्ट ....
    ता लिस्टमधील बहुतेक गोष्टी मलाही करायाच्या बाकी आहेत ...एकदम नोस्टॅल्जिक होऊन गेलो पोस्ट वाचताना....

    ReplyDelete
  2. @ Shrikant
    धन्यवाद कमेंट दिल्यबद्दल
    .

    ReplyDelete
  3. @ davbindu
    ब्लॉग वर स्वागत. खरच आपण जगायचेच विसरुन जातो.

    ReplyDelete
  4. @ Chetna...

    धन्यवाद ब्लॉग वाचून कमेंट दिल्याबद्दल

    ReplyDelete
  5. सॉलिड लिहिलयंस राव!
    आपल्याला पण हेच म्हणायचंय... आणि आता तर करायचंही आहे! गेली ३४ वर्षे शाळा - कॉलेज - नोकरी - घर......... अशा गोष्टींतच गेली... साला.. जिंदगी जगत गेलो.. आता ती अनुभवायची... बस्स!

    ReplyDelete
  6. जबरदस्त... एकदम मनातलं.

    माझी लिस्ट क्रॉस चेक करतो.. :) :)

    पुलेशु !!

    ReplyDelete
  7. @ sagar kokne
    ब्लॉग वर स्वागत. आत्ताच तुझी पोस्ट वाचली आणि कमेंटली पण.
    धन्यवाद.

    ReplyDelete
  8. @ jigar pandya

    धन्यवाद जिगर सुंदर कविता. खरच फक्त एका धक्क्याचीच जरुरत आहे.

    ReplyDelete
  9. धन्यवाद मी मराठी. ब्लॉग वर स्वागत.

    ReplyDelete
  10. Super liked!!!! But nustich list kelis? Execution kadhi pasun? :)

    ReplyDelete
  11. धन्यवाद अनुराधा
    लवकरच execute करू...

    ReplyDelete

Back
to top