जंजिरा भाग १

जंजिरा !!! खूप दिवसापासून ह्या किल्ल्याबद्दल ऐकून होतो. अजिंक्य किल्ला, अभेद्य किल्ला, मराठे, इंग्रज, पोर्तुगीज ह्यांना न जिंकता आलेला किल्ला, शिवरायांचा राहिलेले स्वप्न वगैरे वगैरे खूप ऐकून होतो. त्यामुळेच सुट्टीत खास करून जंजिरा किल्ल्यावर जायचे ठरवले. खूप जिज्ञासा होती, असे काय असेल त्या किल्ल्यात जेणेकरून हा किल्ला इतिहासात कधीच पडला नाही? शिवराय, संभाजी सारख्या धुरंधर राजांना हा जिंकता आला नाही. इंग्रज, पोर्तुगीज सारख्या समुद्री लढाईत सराईत असणाऱ्यांना हा किल्ला घेता आला नाही.
किल्ले जंजिरा
सकाळी अलिबाग वरून ८ वाजे पर्यंत निघायचे ठरवले होते. पण मार्केट मध्ये फिरताना वेळ झाला तसेच वाटेत लागणारी मंदिरांचे दर्शन घेत घेत किल्ल्यावर पोहोचायला दुपारचे २ वाजले. एसी गाडीत होतो तोपर्यंत काही वाटले नाही पण जसे गाडीतून बाहेर पडलो तसे दुपारचे उन काय असते ते जाणवले. दुपारच्या रणरणत्या उन्हात गाडी पार्क करून किल्ल्यावर जायला निघालो. किल्ल्यावर जायचे तिकीट काढून लाईन मध्ये उभे राहिलो. सुट्ट्या लागून आल्यामुळे भयंकर गर्दी होती आणि वर उन्हाने जीव निघून जात होता.


DSCN2447
बोटीत कोंबलेली माणसे
किल्ला एका बेटावर बांधला असल्यामुळे किल्ल्यावर जायला बोटीनेच जावे लागते. अर्धा तास लाईन मध्ये उभे राहिल्यावर नंबर आला. एखाद्या छोट्या खोक्यात त्याच्या मर्यादेबाहेर गपागप रद्दीचे पेपर कोंबावे तसे बोटीत माणसे भरली जात होते. एक गोष्ट इथे खटकली ती म्हणजे बोटीच्या मर्यादेबाहेर माणसे कोंबली जात होती. बोट सुद्धा काही मोठी नव्हती. अगदी छोट्या शिडाच्या होड्याच असतील त्या. मांडी घालून बसावे लागत होते. वाऱ्याच्या एका जोराबरोबर कधीही होड्या कलंडू शकल्या असत्या आणि चुकूनमाकून असे काही झाले असते तर सुरक्षेचा काहीच बंदोबस्त नव्हता. ना पोलीस होते ना कोस्ट गार्ड होते. सर्व काही नशिबावर अवलंबून होते.


DSCN2445
बोटीतून दिसणारा जंजिरा किल्ला
बोटीत बसल्यावर बोट चालवायचा चार/पाच माणसे होती कारण बोट कुठल्या मोटर अथवा बॅटरी वर चालत नव्हती तर हवेवर फडकणाऱ्या शीडावर चालत होती. त्यांचे कौशल्य वाखाणण्यासारखे होते. बरोबर हवेच्या दिशेला होडीचे शीड फिरवून ते बोट हाकत होते. दोन टोकाला दोन बांबू घेऊन होडीला फक्त वळवून दिशा देत होते. किल्ला समोर दिसत होता पण बोट पूर्ण इंग्रजी सी अक्षरासारखे नागमोडी फेरे मारून किल्ल्याकडे जात होती. खूप गर्दी असल्यामुळे आणि सहा सात बोटी आधीच लाईन मध्ये असल्यामुळे उतरायला अर्धा तास गेला.  होडी चालवणाराच एक माणूस गाईड म्हणून यायला तयार होता.  प्रत्येकी तीस रुपये घेऊन तो पाऊन तास आम्हाला किल्ल्यावर फिरवणार होता. प्रत्यक्षात वीस मिनिटात त्याने काम तमाम केले ही गोष्ट वेगळी पण माहिती चांगली दिली.

DSCN2442
शिडाच्या बोटी
DSCN2450
गर्दी असल्यामुळे खूप बोटी किल्ल्याला लागून होत्या.
DSCN2456
किल्ल्याचे मजबूत बुरुज आणि प्रवेशद्वार 
DSCN2453
होडीतून उतरायलाच अर्धा तास लागला.

DSCN2455
किल्ल्याचे मजबूत बुरुज
किल्ल्याचे भक्कम आणि विशाल बुरुज किल्ल्याच्या मजबुतीची साक्ष देत होते. बोटीवरच त्याने सांगायला सुरुवात केली कि किल्ला बांधून जवळपास साडे पाचशे वर्ष होत आली आहेत पण हे किल्ल्याचे बुरुज उन, पावसाचा आणि समुद्राच्या खाऱ्या पाण्याच्या लाटांचा सामना करत तसेच ताठ मानेने उभे आहेत. एवढ्या वर्षात कुठलाच बुरुज ढासळला नाही. बुरुजाचा पाया फक्त नगण्य असा दोन ते तीन इंचच झिजला आहे. गाईड ने सांगितले कि ह्या किल्ल्याचे प्रवेशद्वार कुठून आहे ते बाहेरून बघणाऱ्याला समजणारच नाही. जो पर्यंत दरवाज्यासमोर येत नाही तो पर्यंत प्रवेशद्वार कुठे आहे ते समजत नाही.माहित नाही पण मला मात्र प्रवेशद्वार किनाऱ्यावरूनच दिसत होते. त्यापेक्षा रायगड किंवा सिंधुदुर्ग किल्ल्याचे प्रवेशद्वार जास्त चांगले वाटते. जे जवळ जाई पर्यंत दिसत नाही. किल्ल्याच्या भव्य प्रवेशद्वारात उतरलो आणि पायऱ्या चढून किल्ल्यात प्रवेश केला. गाईड सोबत होताच त्याने इतर गाईड प्रमाणे एका विशिष्ट आवाजात ओरडून आपली कॅसेट चालू केली.
DSCN2454
बोटीतून दिसणारे बुरुज
DSCN2461
बोटीतून दिसणारे बुरुज

5163238849024012606_Org
उद्धव ठाकरे ह्यांनी काढलेला हा फोटो बघा मग कल्पना येईल.
जंजिरा किल्ला हा एका बेटावर बांधलेला किल्ला आहे. हे अंड्याच्या आकाराचे बेट जवळपास बावीस एकरवर पसरलेले आहे. जंजिरा हा शब्द बहुतेक अरेबिक भाषेमधून आला आहे.-जझीरा- म्हणजे समुद्रात असलेले बेट.  मराठ्यांच्या काही कागदपत्रात ह्या किल्ल्याचा उल्लेख हबसण (हबशी लोकांचे) म्हणून आहे. ह्या बेटावर आफ्रिकन वंशाचे हबशी लोक राहत होते. काहीजण ह्याचा उल्लेख जल-जीरा (पाण्यात असलेला किल्ला) म्हणूनही करत होते. हा किल्ला तेथे राहणाऱ्या कोळी लोकांच्या हाती होता ते लोक ह्या किल्ल्यामध्ये राहत होते आणि मासेमारी करून आपला उदरनिर्वाह करत होते. त्यांनी तटबंदी म्हणून लाकडाची भिंत उभारली होती. १५ व्या शतकात अहमदनगरच्या निजामशाहीचा एक सरदार पीर खान ह्याने तो किल्ला आपल्या ताब्यात घेतला. पुढे मल्लिक अंबर नावाच्या एका हबशी सिद्धीने (जे आफ्रिकेमधून आलेले होते असा अंदाज आहे) हा किल्ला अजून मजबूत केला. त्यानंतर सिद्दीने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले. कधी त्याने आदिलशाहीची सोबत केली तर कधी मुघलांशी. पण स्वत:चे अस्तित्व त्याने शाबूत ठेवले आणि स्वत:ची एक वेगळीच अशी दहशत त्याने समुद्रावर निर्माण केली. त्याचे साम्राज्य मराठी, इंग्रज, पोर्तुगीज कोणीच नाही भेदू शकले. किल्ला १९४७ पर्यंत म्हणजे भारत स्वतंत्र होईपर्यंत सिद्दीच्याच ताब्यात राहिला.


शिवरायांना हा किल्ला हवा होता कारण समुद्रावर दहशत बसवण्यासाठी ह्या सारखा सुंदर किल्ला नव्हता. पोर्तुगिज, इंग्रज किंवा इतर येणाऱ्या व्यापारी जहाजांकडून सिद्दी भरमसाट कर वसुली करायचा. त्याची गलबते ही समुद्रावर खूप पसरली होती. जी छोट्यामोठ्या जहाजांवर हल्ला करून लुटायची आणि सर्व लुट किल्ल्यावर आणून ठेवायची.


DSCN2462
पीर बाबाची कबर
किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यावर पीर बाबाची एक कबर दिसते. गाईड ने सांगितल्याप्रमाणे हबशी लोक इथे दररोज संध्याकाळी येऊन दिवे लावायचे आणि कबरीच्या पाया पडून जायचे. एकदा समुद्राला मोठी भरती आलेली होती. भरतीचे पाणी कबरीला येऊन लागले. त्यामुळे सिद्दीने किल्ला बांधायचा विचार केला. त्यावेळी किल्ल्यात हिंदू आणि मुस्लीम ह्या दोनच मुख्य जमाती होत्या. किल्ला बांधायला जवळपास बावीस वर्षे लागली. किल्ला बांधायला लागलेला खडक हा बेटावरच असलेल्या कातळातून खोदून काढलेला आहे. हा कातळ खोदल्याने झालेल्या मोठ्या खड्ड्यात गोड्या पाण्याचे झरे लागले आणि त्याचे पुढे तलावात रुपांतर केले गेले. तलाव ही चांगला बाधून काढलेला आहे. भर उन्हाळ्यात ही त्यात खूप पाणी होते. कदाचीत किल्ला न पडण्याचे हे एक चांगले कारण आहे. किल्ल्याला बाहेरून जरी वेढा पडला असला तरी आतील सैन्याला कधी पाण्याची कमतरता नाही पडली. धान्याच्या मोठ्या गोदामात वर्षोनवर्षे पुरेल एवढे धान्य उपलब्ध असायचे. त्यामुळे वेढा घालून ह्या किल्ल्याला कधी पाडता आले नाही.






DSCN2463
कबरी वर उर्दू मध्ये कोरलेले आहे 
DSCN2469
किल्ल्यावरची तोफ
किल्ल्याच्या प्रत्येक बुरुजावर त्या काळी मोठमोठाल्या लांब पल्ल्याच्या तोफा होत्या. त्यातील काही तोफा अजून ही किल्ल्यावर आहेत. त्या इथे कशा आणल्या गेल्या असतील का इथेच बनवल्या गेल्या असतील ? एवढ्या कडकडीत उन्हात असुनही त्या जरा सुद्धा तापल्या नव्हत्या. ह्या तोफा बनवताना पंचधातू वापरले गेले होते त्यामुळे रखरखत्या उन्हात ही त्या थंड होत्या. किल्ल्यावरचे बुरुज जरी मजबूत स्थितीत असले तरी आतील महालाची, घरांची खूप पडझड झाली होती. प्रत्येक बुरुजाखाली मोठमोठाले कमानी वर उभे असलेले दालन होते. ह्या कमानी मधून बाहेर येणारा शत्रू दिसायचा पण बाहेरील शत्रू किल्ल्यामध्ये दिसायचे नाही. ह्यामागे पण किल्ला बनवणाऱ्या कारागिरांचे कसब दिसून येते. खाली दिलेल्या फोटोमधील कमानी जर बघितल्या तर सर्वात शेवटची कमान ही छोटी आहे आणि नंतरच्या कमानी हळू हळू मोठ्या होत जातात. जेणेकरून किल्ल्यात उभे राहणाऱ्याला बाहेरचे स्पष्ट दिसते पण बाहेरून बघणाऱ्याला फक्त कमानीच दिसतात. ह्या कमानीचे बांधकाम अतिशय उत्कृष्ट केलेले आहे. मोठ मोठाले दगड विना सिमेंट, कॉंक्रीट शिवाय अजून ही कमान सांभाळून आहेत. ह्या कमानीवर असलेलें स्लॅब हा जवळपास सहा फुटाचा आहे त्यामुळे बुरुजावरून धडाडणाऱ्या मोठमोठाल्या तोफांचे आवाज खाली घुमत नसायचे आणि कमानींची ही पडझड होत नसायची.
DSCN2491
DSCN2492
DSCN2493
कमानींचे बांधकाम
DSCN2473
कलाल बांगडी
DSCN2475
लांडा कासम 

DSCN2500
चोर दरवाजा 
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या विरुद्ध एक छोटा चोर दरवाजा होता. ह्या दरवाज्याची मांडणी सुद्धा अश्या पद्धतीची होती कि बाहेरून बघणाऱ्याला ती फक्त एक छोटी खिडकी वाटावी आणि आतून जाणाऱ्याला तो दरवाजा दिसावा. ह्या दरवाज्याच्या बाहेर मोठाल्या बोटी नांगर टाकून असायच्या.

किल्ल्याच्या मध्यभागी एक छोटी टेकडी आहे. ही टेकडीच ह्या बेटावरील सर्वात उंच जागा. येथून पूर्ण किल्ल्यावर तसेच समुद्रावर आणि किनाऱ्यावर ही नजर ठेवता यायची. ह्या टेकडीवरून  दोन गोड्या पाण्याचे तलाव, मशीद, सर्व बुरुज दिसतात. उंच असल्यामुळे समुद्राचा वारा येथे खूप जोरदार वाहत असतो.




DSCN2511
टेकडी वरून दिसणारा अरबी समुद् आणि किनारा 
DSCN2513
टेकडी वरून दिसणारा किनारा, गोड्या पाण्याचे तलाव


किल्ल्याच्या मधोमध ७ मजली राजवाडा होता. आता त्याचे फक्त तीन ते चार माळेच दिसताहेत. महालाच्या भिंतीवर वाढणारे झाडे जोरदार वाऱ्याने उन्मळून पडतात आणि येताना वाड्याचे मोठमोठाले दगड खाली घेऊन येतात. ह्या वाड्यासमोरच्या सपाट जागेवर सिद्दीचा दरबार चालायचा.

DSCN2531
भग्न अवस्थेतला महाल
DSCN2533
भग्न अवस्थेतला महाल
DSCN2541
बर्मासागाचा दरवाजा
देश स्वतंत्र झाल्यावर हा किल्ला भारत सरकारच्या ताब्यात आला काही वर्षांनी हा किल्ला पुरातत्व खात्याच्या ताब्यात गेला. त्यानंतर येथे राहणारे रहिवासीना काही काम नसल्यामुळे बाहेर पडावे लागले पण जाता जाता त्यांनी आपल्या घराच्या खिडक्यांना, दरवाजांना असेलेले सागाची लाकडे काढून नेली. काही लाकडे निघत नसल्यामुळे त्यांनी दगडी तोडून खिडक्या, दरवाजे तोडून काढले.  त्यामुळे ह्या किल्ल्याची अजून हालत झाली. किल्ल्याचा मुख्य दरवाजा सुद्धा सागाचा आहे. हे दरवाजे बर्मा देशातून आणलेले बर्मासाग नावाच्या सागापासून  बनवलेले आहेत. ह्या सागाची लाकडे आपल्या देशात मिळत नाही फक्त बर्मा च्या जंगलातच मिळतात. ही लाकडे एवढी मजबूत आहेत कि गेले पाचशे वर्षाहून अधिक काळ ते उनपाऊस, समुद्राची खारी हवेचा मार घेत अजून उभे आहेत पण जराही झिजले नाहीत. दरवाजाचे बिजागर सुद्धा दगडी कमानी मध्ये अश्या रीतीने बसवले आहेत कि ज्याने दरवाजाची उघडझाप होतेच पण दरवाजाचे वजन ही सांभाळले जाते. दरवाज्याच्या साखळ्या ह्या लोखंडामध्ये शिसे ओतून केल्या असल्यामुळे अजून ही मजबूत आहेत आणि जराही गंजल्या नाहीत.



DSCN2539
लाकडे काढून नेल्यामुळे राहीलेल भग्न अवशेष. आणि आपले कलाकार भारतीय लोक जिथे जातील तेथे आपल्या नावाची लाल करत असतात 
DSCN2543
शिसे वापरून केलेल्या लोखंडी कड्या.
DSCN2542
दगडी बिजागरे
DSCN2546
सिद्दीचे निशान
दरवाज्याच्या प्रवेशद्वारावर एक आकृती/ निशान  कोरलेली दिसते. ह्यात एक वाघ आपल्या चारही पंज्याखाली चार हत्तींना मारत आहे आणि आपल्या तोंडाने पाचव्या हत्तीवर वार करत आहे. हे सिद्दीचे निशान व राजमुद्रा होती. वाघाने हत्तीला मारणे त्यांच्यामध्ये विजयाचे आणि शौर्याचे लक्षण मानले जायचे. किल्ल्यात राहणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषाकडे हे निशान कोरलेले एक नाणे असायचे. किल्ल्यातील कोणीही माणूस बाहेर गेला आणि परत किल्ल्यात आला तर त्याला हे निशान दाखवावे लागे आणि जर त्याने प्रवेशद्वारावर तेवढ्या ठराविक वेळेत जर निशान नाही दाखवले तर वर असलेल्या तीन झरोक्यामधून तीन तिरंदाज बाणाने त्याचा वेध घेऊन त्याला तिथेच ठार मारायचे.




DSCN2552
प्रवेशद्वारावर असणारा घुमट

आणि आता परतीच्या प्रवासाला लागलो 
DSCN2551
हा किल्ला अजिंक्य का राहिला असेल ह्याची कारणे शोधायचा प्रयत्न केला. ती पुढच्या ब्लॉग मध्ये लिहीत आहे.
आणि काही अजून फोटो ही अपलोड करत आहे. नक्की भेट दया 

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Back
to top