कर्नाळाचा ट्रेक

कर्नाळाचा ट्रेक

Collage Gang
काही महिन्यापूर्वी आम्ही कर्नाळा अभयाअरण्यात गेलो होतो. ठाण्यापासून कर्नाळा जवळपास ५३ किमी आहे. अंतर जास्त नव्हते म्हणून आम्ही मित्रांनी बाईक वर जायचे ठरवले. कॉलेजात असल्यापासून बाईक ची खूप हौस होती. त्यावेळेला वाटायचे बाईक असती तर खूप फिरायला गेलो असतो. पण बाईक आल्यावर ऑफिस ते घर आणि घर ते ऑफिस शिवाय काही प्रवासच नाही केला. ह्या वेळेला ठरवले होते अंतर कमी आहे तर बाईक वर प्रवास करुया. कधी पासुनची एक इच्छा पण पुर्ण होईल आणि एक नवीन अनुभव हि मिळेल. मग काय नेहमीप्रमाणे हो-नाही करत कॉलेजचे पांच मित्र (जिगर, सुनील, गजेंद्र, गणेश आणि मी) तयार झालो. तीन बाईक होत्या, माझी पल्सर १५०, जिगरची होंडा युनिकॉर्न, गणेशची प्लॅटिनम प्लस. रविवारचा दिवस ठरवला. ऑगस्ट महिना असल्यामुळे पावसाचा जोर जरा कमी झाला होता. मध्येच रिमझिम पडून जात होता. आभाळ फक्त भरून असायचे. त्यामुळे बाईक ओल्या निसरड्या रस्त्यांवर काढायला काही भीती नव्हती.
 

मुंबई गोवा हायवे 










गुगल वर नकाशे, रस्ते सर्व बघून ठेवले. ठाणे बेलापूर रोड नुकताच नवीन केला होता त्यामुळे त्या रस्त्यावर ड्रायविंग करायला मजा येणार हे नक्कीच होते.सगळे मित्र आळशी आहेत आणि ठरल्या टाईमवर कोणी येणार नव्हते ह्याची खात्री होती. त्यामुळे सर्वाना आदल्या रात्रीच माझ्या घरी राहायला बोलावले होते. जेणेकरून सर्व टाईमवर निघू आणि उन्हं लागायच्या आधी तिथे पोहोचू. पण साल्यांनी टाईमपास करायचा तो केलाच. ७ वाजता निघायचे ठरवले होते. आम्ही ९ वाजता निघालो. गाडीचे टायर चेक केले. हवा भरली, ब्रेक चेक केले आणि सरळ ठाणे-बेलापूर रोड पकडला. 

ठाण्यातून बाहेर पडलो कि विटावा गाव येते, ठाण्याची हद्द तेथे संपते, हद्द संपल्यावरच एक पेट्रोलपंप आहे. तेथे पेट्रोल जवळपास दोन ते तीन रुपये स्वस्त असते कारण ठाण्यात येतानाचा लागणारा जकात लागत नाही. गाडी ला पेट्रोल पाजले, टाकी फुल करून ठेवली. गरज नव्हती पण स्वस्त मिळते म्हणून भरून ठेवले. मध्ये कुठे ब्रेक न घेता सरळ बेलापूर पर्य़ंत प्रवास केला. पाउण तासातच सीटला मुंग्या आल्या म्हणून उतरावे लागले. जवळपास चहा घ्यायचा विचार होता पण चांगले हॉटेल काही दिसले नाही म्हणून ती आयडिया रद्द करत 10 मिनिटानी परत प्रवास चालू केला. 

कर्नाळाचा बोर्ड 
पुढे एक जंक्शन ला मुंबई गोवा महामार्गावर डाव्या बाजूला वळून जेएनपीटी फाटा ओलांडून गोवा रोड पकडला. फाट्य़ा पासून कर्नाळा जवळपास ११ किमी आहे. तो अकरा किमीचा रस्ता शहर सोडल्याची जाणीव करून देतात. चारपदरी रस्ता जाऊन दोनपदरी नागमोडी रस्ता येतो. दोन्ही बाजूला गर्द हिरवीगार झाडी, पक्ष्यांचे किलबीलणे, हिरवे डोंगर दिसू लागतात. मन प्रसन्न व्हायला सुरुवात होते. कर्नाळा पक्षी अभयारण्याचा वाकडा झालेला बोर्डने कर्नाळा आल्याची जाणीव करून दिली.
कर्नाळा मुख्यत्वे त्याच्या रांगड्या पणासाठी प्रसिद्ध आहे. सरळसोट चढाई, सुंदर निसर्ग जवळपासच्या ट्रेकर्स ला नेहमीच खुणावत आला आहे. मानससरोवर ला घेऊन जाणारे टूरिस्टवाले सुद्धा लोकांना सराव करण्यासाठी म्हणून कर्नाळा चा ट्रेक करायला सांगतात. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. पक्षीप्रेमींची सुद्धा येथे मोठी वर्दळ असते. कर्नाळाच्या पायथ्याशी वनखात्याचे चेक पोस्त आहे. गाडी पार्किंग ला चांगली जागा केली आहे. बाईक असेल तर अजून थोडे वर पर्य़ंत जाता येते. इथे रस्त्यावर उभे राहूनच कर्नाळाच्या किल्ल्याचा सुळका आकाशांत उंच ढगामध्ये गेलेला दिसून येतो.
कर्नाळा किल्ल्याचा नकाशा 
वनखात्याचा चेक पोस्ट
             

हायवे वरुन दिसनारा सुळका 


हायवे वरुन दिसनारा सुळका- झुम फोटो
 

मित्रांची मस्ती
जुनी सवय दुसरांच्या गाडीच्या बाजूला उभे राहून फोटो काढायचे.

हॉटेल कर्नाळा
ट्रेक ला सुरुवात करण्यापूर्वी जर काही नाश्ता करायचा असेल तर पुढे गोव्याच्या दिशेने जवळपास १ किमी किंवा त्याहून हि कमी अंतरावर एक 'हॉटेल कर्नाळा' म्हणून आहे. कोंकणी पद्धतीने बांधलेले कौलारू हॉटेल खूपच छान आहे. सर्व बाजूने मोकळे असल्यामुळे निसर्गामध्येच बसून जेवल्याप्रमाणे वाटते. ह्या हॉटेल मधले सर्व पदार्थ खूप सुंदर आणि चवदार असतात. आशा भोसले, अनुपम खेर वगैरे सारखे अनेक छोटे मोठे सेलीब्रेटिज इथे जेवून जातात.  त्यांनी सह्या केलेला बोर्डच तिथे लावलेला आहे. आम्हीही खास बटाटा वडा सांबर, मिसळ पाव, पुरी भाजी वगैरे सारखे टिपिकल मराठी पदार्थच मागवले आणि बोर्ड वर लिहिल्याप्रमाणेच खरच त्यांची चव खूपच चांगली होती. खूप दिवसांनी तिखट झणझणीत मिसळ चा आनंद घेतला. ह्या हॉटेल मध्ये बसून समोरच कर्नाळ्याचा सुळका स्पष्ट दिसतो. 

हॉटेल कर्नाळा
हॉटेल मधून दिसणारा कर्नाळाचा सुळका


नाश्ता करून पाण्याच्या बॉटल भरून घेऊन निघालो नि सरळ ट्रेक चढायला सुरुवात केली. वनखात्याच्या चेकपोस्ट वर आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. इथे एन्ट्री फी भरावी लागते आणि आपल्याकडे जर प्लास्टिक च्या बॉटल असतील तर त्याचे डिपोजिट जमा करावे लागते आपण परत आल्यावर बॉटल दाखवून डिपोजिट परत घ्यायचे. जर संध्याकाळ पर्य़ंत गेलेली माणसे परत नाही आली तर वनखात्याच्या अधिकार्‍यांना भर जंगलात रात्रीचे शोधावे लागते म्हणून आपण परतताना त्यांना माहिती दिली तर चांगले.

जंगलाच्या पायवाटेवर चालत गेलो कि कुठेही चुकायला होत नाही. आधी गेलेले आणि परतणारे ट्रेकर्स आपल्याला भेटत राहतात. जर ट्रेकिंग ची सवय नसेल तर १० मिनिटातच दमायला होते. आम्ही मध्ये मध्ये थांबे घेत हळू हळू चढत राहिलो. जवळपास ३ तास च्या वर आम्ही चढत होतो. सुनिल आणि गणेश सोडला तर बाकि सगळय़ांची हवा टाईट झाली होती. पण किल्ला काही दिसायला तयार नव्हता. त्यात वरून येणारे लोक अजून अर्धा किल्ला पण नाही चढला आहात असे सांगून घाबरवत होते.



जंगलात थोडे वरपर्यंत बाईक जायला परवानगी आहे.


बाईक पर्किंग जागा


चढाई ला सुरुवात



आजूबाजूचे जंगल


आजूबाजूचे जंगल



आजूबाजूचे जंगल
कसे बसे करत आम्ही पठारावर पोहोचलो आणि वरून जो काही नजरा दिसला तो बघून सर्व त्रास, झालेली सर्व दमछाक विसरून गेलो. पठारावर सुंदर हिरवीगार चादर पसरल्यासारखे हिरवळ पसरली होती. नुकताच हलका पावूस येऊन गेल्याने सर्व गवत ओले होते. भयंकर दमलो असल्यामुळे कपड्याचा काही विचार न करता सरळ हिरवळीवर लोळण घातली. पठारावरून दिसणारा सह्याद्रीच्या नजरा तर अप्रतिम होता. सह्याद्रीला बघून घट्ट मिठीत घ्यावेसे वाटत होते.


पठारावरून दिसणारे दृश्य



पठारावरून दिसणारे दृश्य
 

पठारावरून दिसणारे दृश्य


पठारावरून दिसणारा कर्नाळा किल्ला
इथून सुळक्याच्या पायथ्यापर्यंत जाणारा रस्ता थोडा किचकट होता. आमच्या पैकी एका मित्राला चढायला न जमल्यामुळे तो मागेच राहिला आणि त्याच्याबरोबर मला हि मागे राहावे लागले. बाकीचे मित्र सुळकाच्या पायथ्यापर्यंत जाऊन आले. वरून दिसणारे निसर्गाचे अप्रतिम सौंदर्य बघून मन तृप्त होते. मनाला खूप प्रसन्न वाटते. घोंघावणारा थंड वारा थकलेल्या अंगाला सुखावतो. आम्ही त्या जिवंत सौंदर्याचा उपभोग घेत निसर्गाच्या कुशीत खूप वेळ पडून राहिलो. वर पसरलेले आकाश क्षणात मोकळे असायचे तर क्षणात काळ्या ढगांनी गच्च भरून जायचे. खाली गवताची मखमली चादर. ह्याहून सुंदर बिछाना कुठे मिळणार? जैत रे जैत सिनेमा मध्ये ह्याच किल्ल्यावरची शुटिंग केली आहे. ते आठवत तसेच पडुन राहिलो.


गवताची चादर आणि आकाशाचे पांघरूण


गवताची चादर आणि आकाशाचे पांघरूण


सुंदर हिरवळ 
उतरायचे कसे ????
संध्याकाळ होत आली तसे आम्हाला निघावे लागले कारण पावसामुळे जंगल खूप वाढले होते आणि अंधारात रस्ता चुकायचे चान्सेस जास्त होते. खाली उतरून आल्यावर चेकपोस्ट वर माहिती दिली आणि डिपोजिट परत घेतले. सडकून भूक लागली होती अंग खूप थकले होते आणि तहान हि भयंकर लागली होती. त्यामुळे परत हॉटेल कर्नाळा मध्ये गेलो. सडकून नाश्ता केला. मस्त दोन कप कडक चहा पिला आणि मग परतीच्या प्रवासाला लागलो. ट्रेकिंग मुळे पायाच्या मांड्या आणि पोटर्‍या भरून आल्या होत्या बाईक चे गियर बदलतानाहि त्रास होत होता. हळु हळु गाडी चालवत कसे बसे करत घरी पोहोचलो. रात्री बिछान्यावर झोपलो तेव्हा हिरवळीची नक्कीच आठवण आली. पुढचा आठवडा किल्ल्यावरचा सुंदर निसर्ग आणि दुखनारे पाय कर्नाळा किल्ल्याची आठवण देत होते. 








किल्ल्यावरून दिसणारे विहंगम दृश्य
 

CONVERSATION

0 comments:

Post a Comment

Back
to top