
पावसाची रिपरिप थांबली होती त्यामुळे सुरुवात तर चांगली झाली होती. आजूबाजूची हिरवळ आणि निसर्गसौंदर्य डोळ्यात साठवत पुढे गाड्या हाकायला सुरुवात झाली. पुढे साकेत टोल नाक्याजवळ गाडी डावी कडे ठेवत रेतीबंदर- मुंब्रा कौसा-मुंब्रा बायपास- शिळफाटा- पलावा करत अंबरनाथ-बदलापूर रोडला लागलो. वाटेत मागे थांबलो होतो तिथेच ----------हॉटेल मध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलो. तिथे मागच्या वेळेला असणारी मोठा टिक्का लावलेली ती आगरी मालकीण बाई नव्हती. नाष्ट्यासाठी भुर्जी पाव, आम्लेट पाव, मिसळ पाव, बटाटा वडा सांबरची ऑर्डर दिली. सगळेच उपाशी निघालो असल्यामुळे पोट भर हादडून घेतले. तोपर्यंत ती मालकीण बाई आली आणि आम्ही ओळखीचे असल्या प्रमाणे घरच्या गप्पा मारायला लागली.
 |
| हरियाली और रास्ता. |
इथे माझ्या बुलेट ने एक प्रॉब्लेम केला. गाडी निघाल्यापासून थोडी जड होत होती...पाहिजे तशी पळत नव्हती. मुंब्रा बायपास डोंगर चढता चढता तर गाडी एवढी दमली की गाडीच्या चेन मधून धूर यायला लागला. हॉटेल मध्ये नाश्ता होई पर्यंत बुलेटला थंड होऊ दिले....नेमका जोरात पाउस आला आणि गाडी पूर्ण थंड झाली. पण ज्या हिशोबाने गाडी मधून धूर येत होता...मला वाटले होते कि मला इथून परतीचा प्रवास करावा लागणार बहूतेक....सुजित ला म्हटले तुम्ही चौघे जाऊन या...मी परत जातो. पण पाउस आला आणि गाडी बऱ्या पैकी थंड झाली. टूल बॉक्स काढून ब्रेकचा नट जरा मोकळा केला. ब्रेक कमी लागायला लागले पण गाडी मोकळी झाली.
पुढे बदलापूर पर्यंत जायचे ठरले...बुलेट ने सोबत नाही दिली तर तेथेच पार्क करायची आणि मग पुढे ट्रेनने जायचे ठरले. पण नशिबाने बुलेटने मध्ये कुठेच कुरकुर केली नाही. मध्ये मध्ये दोन तीन थांबे (hault) घेत फोटो शूट करत आम्ही साडे बारा पर्यंत नेरळला पोहोचलो. प्रवास दरम्यान काही काढलेले हे फोटो.
आणि आतापर्यंत कधी न घडलेली अनपेक्षित गोष्ट आमच्या बरोबर घडली. आम्ही जेवून बाहेर पडलो. आमच्या गाड्या काढल्या आणि 'इथून पुढे काय करायचे आहे हे ठरवण्यासाठी' मी व सुजित पुढच्या झाडाखाली सावलीत जाऊन उभे राहिलो ....धबधब्यावर जायचे आहे का? परतीच्या प्रवासाला लागायचे आहे का? आम्ही विचार विनिमय करत उभे होते तेव्हढ्यात जिगर आणि विनायक मागून गाडीवरून आले. आम्ही थांबलो होतो म्हणून ते पण बाजूला येऊन थांबले. विनायक उतरला आणि त्याच वेळेला जिगर ची 3/4th ट्राउजर गाडीच्या पेट्रोल लॉक मध्ये अडकली आणि पेट्रोलचा लॉक तुटला. भर रस्त्यात टाकीच्या पाईप मधून पेट्रोल वाहायला लागले. आधी काही सेकंद आम्हाला काही सुचलेच नाही. आम्ही फक्त त्याच्याकडे बघून हसत होतो. नंतर त्यातले गांभीर्य समजायला लागले आणि फटाफट डोळ्यासमोर एक प्रश्न मालिका उभी राहत गेली. एवढे किंमती पेट्रोल वाहून जात होते.....थांबवू शकत नाही का? इथे जवळपास ग़ॅरेज कुठे मिळेल? नाही मिळाले तर गाडी कुठे ठेवायची? इथून घरी कसे जायचे? ग़ॅरेज मिळाले तरी हा जो तुटलेला पार्ट आहे तो मिळेल का ? इथे जवळपास कुठे होंडा चे सर्विस स्टेशन पण नाहीये....ठाण्याला जाऊन परत हा पार्ट आणावा लागेल का? तो पर्यंत गाडी कुठे ठेवायची? गाडी ला धक्का कसा मारायचा? असे एक ना अनेक प्रश्न डोळ्यासमोर उभे राहू लागले.
तेव्हढ्यात जिगर ला सुचले आणि तो ओरडला., 'अबे सालों बोटल में तो पेट्रोल भरकर ले लो....इतना वेस्ट जा रहा है.' मग आमची बॉटल साठी धावपळ चालू झाली...आताच पाण्याची आणि थम्फस अप ची संपलेली बॉटल आम्ही हॉटेल मध्ये ठेवून आलो होतो. विनायकला बॉटेल आणायला पळवले. तोपर्यंत जिगरने बागेतली पाण्याची बॉटेल दिली. त्यातले पाणी झाडामध्ये ओतून आम्ही ती पेट्रोल च्या पाईपला लावली. ती भरते न भरते तोच विनायक बॉटल घेऊन आला..ती पण भरत आली तरी पेट्रोल संपायचे नाव घेत नव्हते. जिगर ने कालच गाडी मध्ये रु.५०० चे पेट्रोल टाकले होते...आणि ते सुद्धा 'पॉवर' चे महागडे पेट्रोल....मिलिंद ला पळवले दुसरी बॉटल आणायला. ती पण भरली...मग परत मिलिंद स्वत:च पळाला चौथी बॉटल आणायला. ती बॉटल पण पूर्ण भरली आणि मगच पेट्रोलची टाकी रिकामी झाली. येणारे जाणरे आमच्या कडे बघून 'हा काय प्रकार चाललाय?' अश्या विचित्र नजरेने बघून जात होते.
आता पुढे काय? हा प्रश्न सगळ्यांना पडला...धबधबा तर बोंबलल्यात जमा होता. इथून घरी कसे जायचे हा प्रश्न होता. वाटेत येताना एक ग़ॅरेज बघितलेले मला आठवत होते. सुजित ला म्हटले, 'चल मागे जाऊन एखादे गॅरेज बघून येऊ. तेव्हढ्यात समोर विरुद्ध बाजूला पार्क केलेल्या बसच्या बाजूला एक माणूस गाडी रिपेअर करताना दिसला.. जवळ जाऊन बघितले तर ते गॅरेजच होते. म्हटले नशीब आहे गाडी पण जागा बघूनच बंद पडली होती. गाडी ढकलत त्याच्या कडे घेऊन गेलो. त्याने तो पार्ट बघूनच सांगितले हा पार्ट मिळणे मुश्कील आहे. एखादा जुन्या गाडीचा भेटला तर तात्पुरता लावून देतो. मग सर्विस सेंटर मध्ये जाऊन नवीन लाऊन घ्या. आम्ही म्हटले बाबा आता काहीही करून गाडी चालू करून दे. पुढचे मग पुढे बघू.
त्याने सर्व शोधून हि त्याला तो पार्ट काही त्याच्या गॅरेज मध्ये भेटला नाही. मग त्याला बुलेट वर घेऊन नेरळच्या मार्केट मध्ये गेलो तिथे एक होंडाच्या पार्ट चे दुकान होते. नशिबाने तिथे तो एकच पार्ट उपलब्ध होता. तो घेऊन आलो आणि त्याच्या मेकानिक ने तो पार्ट चांगला फिट्ट करून दिला. बॉटल मध्ये काढलेले पेट्रोल त्यात टाकले आणि शेवटी गाडी चालू झाली.
(आम्ही पेट्रोल भरताना रस्त्यावरचे लोक 'हा काय प्रकार चाललेय' हे बघत होते)
तोपर्यंत ४ वाजत आले होते. इथे जवळपास कुठे धबधबा आहे का त्या गॅरेज वाल्याला विचारले. त्याचा दुकानच्या बाजूनेच एक कार जाईल एवढा रस्ता गावात जात होता तिथून १५ मिनिटावर धबधबा आहे म्हणून त्याने सांगितले. गाड्या त्या रोड वर घातल्या. वाटेत सगळे पब्लिक परत येताना दिसत होते...सगळ्यांचा घरी परतायचा टाईम झाला होता आणि आम्ही धबधब्यावर चाललो होतो. सिमेंटचा रस्ता, दगडी रस्ता आणि मग चिखल झालेला निसरडा रस्ता करत आम्ही एक ओहोळ जवळ जाऊन थांबलो. खूप मुले, मुली तिथे पाण्यात बसलेली होते. काही मुले पाण्यातल्या दगडावरच दारू आणि बिर्याणीच्या पंगती लावून बसले होते. गाडी पार्क करून आम्ही तो ओहोळ पार केला आणि तिथे भेटलेल्या एका गावाच्या मुलाला विचारले कि इथून जवळ धबधबा आहे का? त्याने दोन दिशांना बोट दाखवुन सांगितले कि इकडे पण आहे आणि तिकडे पान आहे.
अंधार पडायच्या आधी निघायचे होते म्हणून आम्ही परतीला लागलो. दिवसभरचा प्रवास आणि आता धबधब्यावर चढून जाणे आणि पाण्यात डुंबून हात पाय भरून आले होते. एका कडक चहा ची गरज होती. पण जवळपासचे सगळे हॉटेल बंद झाले होते. मग विचार केला पुढे जाऊन एखादे हॉटेल बघून चहा पिवूया.
पुढे विठ्ठल कामत च्या एका हॉटेल मध्ये चहा, भाजी खाऊन नॉन-स्टॉप परतीला लागलो. दोन तासांनी ठाण्यात आल्यावर जरा बरे वाटले. जाऊन येऊन १३५ किमीचा प्रवास झाला.
अप्रतिम निसर्ग सौंदर्य, हिरवीगार शेते, उन पाउस आणि सावलीचा खेळ, बुलेटच्या चेन मधून निघालेला धूर, जिगरच्या बाईकचा तुटलेला पेट्रोल लॉक आणि आमची उडालेली धावपळ, पोटभर स्वादिष्ट जेवण, खळाळता धबधबा, मनसोक्त डुंबणे, मित्रांची सोबत आणि बुलेटची सफारी ह्या मुळे हि पिकनिक काही वेगळीच खास होती. खास करून जिगरच्या गाडी बरोबर घडलेला प्रसंग हा खूप काळ आम्हा सर्वांच्या स्मरणात राहणार आहे.
आता वाट बघायची पुढच्या ट्रीपची...
0 Comments