नकळत एकदा...

आजपण नेहमीप्रमाणे आईने त्याला औषधाच्या गोळ्या काढून दिल्या. आईला नको म्हणून समजावून सांगून सुद्धा तिने गोळ्या आणि पाण्याचा ग्लास आणून दिला. तिला सांगून तरी काय फायदा कि आता ह्या गोळ्यांचा काहीच उपयोग होणार नाही आहे. त्यांनी जे काम करायचे ते त्यांचे करून झाले आहे. आता ह्यांचा काही उपयोग नाही पण जाऊदेत तिला तरी कशाला दुखवायचे. म्हणून त्याने गपचूप गोळ्या खावून घेतल्या.आईने  त्याच्या बारीक कापलेल्या केसावरून प्रेमाने हात फिरवला. गोळ्या खाल्ल्यावर ती निघून गेली.

आज त्याला नेहेमीपेक्षा खूप थकल्यासारखे वाटत होते. मोठ्या बहिणीकडून त्याने आपले सर्व जुन्या फोटोचे अल्बम काढून घेतले होते. शाळेतील सर्टिफिकेट काढून ठेवली होती. लहानपणापासून आतापर्यंत खेळात मिळालेली सर्व मेडल्स आणि ट्रॉफीज काढून बिछान्याच्या बाजूला लावून ठेवल्या होत्या. आपली आवडती क्रिकेटची बॅट, पायाला बांधायचे पॅड्स, हेल्मेट सर्व त्याने जवळ आणून ठेवले होते. मोठ्या बहिणीने आतापर्यंत कधी हातात असलेली वस्तूही दिली नव्हती, कधी भांडली नाही असा एक दिवस गेला नव्हता. पण आता एकदम शहाण्यासारखी वागत होती. गेले महिनाभर तरी ती भांडली नव्हती. तो जे जे मागत होता ते ते हातात आणून देत होती. 

घरातले सर्व झोपी गेले तसे ह्याने आपल्या रूम मधली लाईट लावली आणि सर्व जुने फोटो चाळायला सुरुवात केली. लहानपणापासूनचे आईवडिलांबरोबर काढलेले फोटो, वाढदिवसाचे फोटो, कॉलेज मधील फोटो, क्रिकेटच्या मैदानावर जिंकल्यावर टीमसोबत काढलेला फोटो, पहिली सेन्चुरी मारल्यावर बॅट उंचावताना काढलेला फोटो, त्यावेळेला झालेला आनंद, टीमच्या प्रशिक्षकांनी हात उंचावून वाजवलेल्या टाळ्या, मोक्याच्या क्षणी मारलेल्या शतकामुळे आनंदित झालेले सर्व टीम चे खेळाडूं सर्व सर्व डोळ्यासमोर तरळून गेले. क्रिकेट त्याचा जीव कि प्राण होता. तेंडूलकर, गावस्कर हे त्याचे देव होते. सचिन तेंडूलकर बरोबर काढलेला फोटो तर त्याच्या आयुष्यातली अमूल्य वस्तू होती. तोच फोटो मोठा करून त्याने आपल्या रुमच्या दरवाज्यावर ही लावला होता. कॉलेज, अभ्यास सांभाळून त्याने क्रिकेटचे वेड जीवापाड जपले होते. पुढच्या महिन्यात सुरु होणाऱ्या रणजी सामन्यासाठी त्याचे नाव प्रशिक्षकांनी निवड समितीला सुचवले होते. निवड समितीने पण त्याचा खेळ पाहून त्याला रणजी सामन्यात मुंबई कडून खेळवण्याचे आश्वासन दिले होते. तसे पेपर वर्क ही पार पडले होते. पण बहुतेक नशिबाला त्याचा हा आनंद बघायचा नव्हता म्हणूनच त्याच्या आयुष्याला असे वळण मिळाले होते.

फोटो बघताना त्याला तो दिवस आठवला आणि तो भूतकाळातील कटू आठवणीत गेला. त्यादिवशी दादरच्या शिवाजी पार्क मध्ये नेट सराव करून मित्राबरोबर तो घरी निघाला होता. रेल्वेगाडी तून स्टेशनला उतरल्यावर फ्लॅटफॉर्म वरून चालताना अचानक डोके दुखून त्याला चक्कर आली आणि काही कळायच्या आताच तो खाली पडला. डोक्याला थोडी दुखापतही झाली. जखमेतून रक्त वाहायला लागले. नशीब सोबत मित्र होता म्हणून, त्याने इतरांच्या मदतीने त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन गेले. डॉक्टर ने जखमेवर मलमपट्टी केली आणि चक्कर येण्याचे कारण विचारले. त्याने सांगितले काही माहित नाही पण आजकाल अचानक डोके दुखून येते आणि कधी कधी चक्कर पण येते. डॉक्टरने त्याला सिटी स्कॅन पण करायला सांगितले.  दुसऱ्या दिवशी सिटी स्कॅन चा रिपोर्ट डॉक्टर कडे  घेऊन  गेल्यावर डॉक्टरने हसत सागितले, काही नाही.... सर्व काही नॉर्मल आहे. पण तुझ्या वडिलांना पाठवून दे त्यांच्याशी काही बोलायचे आहे. 

त्याने वडिलांना निरोप सांगितला. त्याचे वडील आपल्या कामात काही जास्तच बिझी असायचे. दिवसभर काम करून थकवा यायचा, वैताग व्हायचा, चीडचीड व्हायची म्हणून दररोज रात्री थोडीशी दारू पिऊनच यायचे. दारू पिल्यावर सर्व टेन्शन, त्रास विसरायला होतो असे त्यांचे म्हणणे असायचे. थोडीशी दारूची सवय कधी जास्त झाली ते त्यांना सुद्धा कळले नाही. डॉक्टर चा निरोप भेटल्यावर सुद्धा ते एका आठवड्यानंतर गेले ते सुद्धा संध्याकाळी...दारूच्या नशेतच.

डॉक्टर ने सांगितले कि तुमच्या मुलाला 'ब्रेन ट्युमर' झाला आहे आणि तो क्रिटीकल स्टेज ला पोहोचला आहे.  आताच जर त्याचे ऑपरेशन केले तर तो कदाचित वाचू शकतो नाहीतर जास्तीत जास्त तो २/३ महिनेच जगेल. वडिलांनी नशेत काय ऐकले ते माहित नाही. ते तसेच परत दारूच्या बार मध्ये जाऊन बसले आणि भरपूर दारू ढोसून घरी येऊन झोपले.

दुसऱ्या दिवशी उठून ते कामालाही निघून गेले. डॉक्टर ने काय सांगितले ते त्यांच्या लक्षात ही राहिले नाही.  त्यांनी घरी पण सांगितले नाही आणि आपल्या मुलाला पण सांगितले नाही. असे काही आठवडे निघून गेले. त्याची डोकेदुखी प्रचंड वाढत होती. अशक्तपणा येत होता. त्याला काही करायला सुचत नव्हते. असेच स्टेशन वरून येताना प्रचंड डोके दुखून चक्कर यायला लागली म्हणून तो परत डॉक्टर कडे गेला. डॉक्टर ने त्याच्यावर काहीच उपाय झाले नाहीत म्हणून आश्चर्यचकित होऊन विचारले कि तुला तुझ्या वडिलांनी काही सांगितले नाही का? त्याने विचारले काय सांगायचे होते? मला सांगा. तुम्ही माझ्यापासून लपवून ठेवू नका. डॉक्टर ने सांगितले कि तुला ब्रेन ट्युमर झाला आहे आणि तो क्रिटीकल स्टेजला ही पोचला आहे. तुझ्यावर या आधीच उपचार झाले पाहिजे होते. खूप उशीर केला आहेस. 

ते ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मोठा धीर करून त्याने विचारले कि डॉक्टर हा आजार ठीक होणार नाही का ? डॉक्टर म्हणाले कि काही गॅरेंटी देऊ शकत नाही. ऑपरेशन क्रिटीकल असते आणि सक्सेस होईल कि नाही ह्याची शक्यता कमीच असते. तो काय समजायचे ते समजून गेला. त्याने उदास होऊन विचारले कि, 'डॉक्टर आता माझ्यापाशी किती दिवस शिल्लक आहेत?'  डॉक्टरला काय बोलावे ते सुचलेच नाही. त्यांनी तसेच त्याला ऍड्मिट करून घेतले. घरच्यांना निरोप पाठवून बोलावून घेतले. परत सिटी स्कॅन करून घेतले. ट्युमर अर्ध्याहून जास्त वाढला होता. चांगले एक्स्पर्ट डॉक्टर बोलावून त्याला तपासून घेतले. सर्वानीच सांगितले की खूप उशीर झाला आहे. ऑपरेशन करणे रिस्की आहे आणि ते सक्सेस होण्याचे चान्सेस खुपच कमी कदाचित फक्त १० टक्केच असतील. ऑपरेशन ला खर्च ही बराच आला असता तेव्हढी आई वडिलांची ऐपत नाही हे ही त्याला ठावूक होते. त्याने मोठ्या हिमतीने ऑपरेशनला विरोध केला. आईची, बहिणीची रडून रडून हालत झाली होती आणि तो त्यांना धीर देत होता. त्याच्याकडे आता खुपच कमी दिवस शिल्लक होते.

डॉक्टरांची परवानगी घेऊन त्याने आपले शेवटचे दिवस घरात घालवण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी काही पेन किलर देऊन त्याला घरी जायची परवानगी दिली. त्याला फक्त एक दिवसाआड चेकअप साठी यायला सांगितले. डॉक्टरांनी त्याला अंदाजे किती दिवस शिल्लक आहेत ते ही सांगितले. ते त्याने आपल्यापर्यंतच ठेवले घरात कोणाला सांगितले नाही. शेवटच्या दिवसात त्याने एकेक करत सर्व मित्रांची भेट घेतली सर्वाना आपल्याकडून काहीना काही छोट्या मोठ्या भेटी दिल्या. शेवटचे सर्व दिवस अशक्तपणामुळे घरातच बसून काढावे लागले. 

आईच्या चेहऱ्याकडे बघून त्याची खूप तडफड व्हायची. ती पण त्याच्यासमोर एकही अश्रू येऊ द्यायची नाही. पण एकांतात बसून खूप रडायची. तिचे सुजलेले डोळे आणि गालच ती खूप रडली आहे ते सांगायची. बहिणीची पण हालत काही वेगळी नव्हती. वडिलांना तर खूप मोठा धक्काच बसला होता.आपल्या दारूच्या वेडापायी आणि छोट्याश्या चुकीमुळे आपण किती मोठ्या गोष्टीला मुकणार आहे ते त्यांना समजून गेले होते. त्या दिवशीपासून दारू त्यांना कडू लागायला लागली होती आणि ते मनापासून दारूचा तिरस्कार करू लागले होते. आपल्या मुलाचे ऑपरेशन ही आपण करू शकत नाही ही गोष्ट त्यांना जास्त खटकत होती. आयुष्यभर कमावून काहीच हाती लागले नव्हते. आपल्या मुलाचा अंत आपल्या डोळ्यांनीच आपल्याला बघावा लागणार होता. त्यांना जिवंतपणी मेल्यासारखे झाले होते.

त्याला सर्वांचे दु:ख माहित होते पण तो काही करू शकणार नव्हता. मी लवकरच ठीक होईन असा खोटा दिलासा पण देऊ शकणार नव्हता. डोळ्यातून पडणाऱ्या अश्रुने तो भानावर आला. आपल्या बिछान्यावर एक नजर फिरवली. आयुष्यात आतापर्यंत कमावलेले सर्व त्याने आपल्या बिछान्यावर मांडून ठेवले होते. आजच सकाळी चेकअप ला गेल्यावर डॉक्टर ने त्याला सांगितले होते कि तुझ्याकडे शेवटचे २ ते ३ दिवसच शिल्लक आहेत. तुझा मेंदू कधीही काम करण्याचे थांबू शकतो. मनातून खूप हताश झाला होता. आयुष्यात घडलेले सर्व चांगले क्षण आठवण्याचे प्रयत्न केले. शाळेचे दिवस, सुट्टीतील मजा,कॉलेजातील सोनेरी क्षण, जीव तोडून खेळलेले क्रिकेट, वेड्यासारखे बाळगलेले क्रिकेटचे वेड, सचिन तेंडूलकर ला भेटलेले क्षण. सर्व काही त्याच्या डोळ्यासमोर तरळून जात होते. आपली क्रिकेटची बॅट त्याने जवळ घेतली. सचिन बरोबर काढलेला फोटो त्याने हृदयाशी धरला आणि शांत डोळ्याने बेड वर पडून राहिला.
...
सकाळी आईने नेहमी प्रमाणे खिडकी उघडून पडदे बाजूला सरकवले. त्याला उठवण्यासाठी आवाज दिला.... तुझ्या आवडीचा नाश्ता केला आहे. लवकर तोंड धुवून घे !!!..... तो पर्यंत तिने त्याची खोली आवरली. परत आवाज देवून सुद्धा तो उठला नाही म्हणून तिने त्याच्या अंगावरची चादर ओढली. तो शांतपणे क्रिकेटची बॅट आणि सचिन बरोबरचा फोटो घेऊन झोपला होता. चेहऱ्यावर मंद स्मित होते. खावून पिवून तृप्त झालेले बाळ कसे शांतपणे झोपते तसेच काहीसे निरागस भाव त्याच्या चेहऱ्यावर होते. लहानपणी सुद्धा तो असाच खेळणी पोटाशी घेऊन झोपायचा. तिला एकदम भरून आले. त्याच्या केसावरून हात फिरवण्याची तिला लहर झाली.  ती त्याच्या बाजूला बेड वर बसली. हात फिरवल्यावर तो उठेल आणि त्याचा असा निरागस चेहरा पाहता येणार नाही म्हणून तृप्त नजरेने त्याला बघून घेतले आणि पुढे वाकून त्याच्या केसावरून हात फिरवत तिने त्याला हाक मारली...पण ....त्याला स्पर्श होताच ती दचकली. त्याचे सर्व अंग थंडगार पडले होते. तिने त्याला हलवून उठवायचा प्रयत्न केला पण त्याच्याकडून काहीच प्रतिसाद आला नाही.तिने जोरात किंकाळी फोडून घरातल्या सर्वाना बोलावून घेतले. त्याला कदाचित गाढ झोप लागली असेल म्हणून तिने त्याचे खांदे धरून गदगदा हलवले पण तो थंडच होता....त्याच्याकडून काहीच प्रतिसाद नव्हता....येणार ही नव्हता....चेहऱ्यावरचे निरागस भाव कधीच विस्कटणार नव्हते.....तृप्त मनाने त्याने सर्वांच्या नकळत ह्या जगाचा निरोप घेतला होता....चेहऱ्यावरचे मंद स्मित कधीच पुसले जाणार नव्हते. क्रिकेट त्याचा जीव कि प्राण होता....सचिन त्याचा देव होता. त्या दोघांच्या सोबतच त्याने आपला छोटासा जीवन प्रवास संपवला होता. 

आयुष्यात कमावलेले सर्व काही त्याने आपल्या बेड वर मांडून ठेवले होते. आयुष्यात काहीच करता आले नाही ह्याची त्याला खंत राहिली होती पण सचिनच्या फोटोने कदाचित थोडी कां होईना त्याची भरपाई केली होती. जन्माला आलेले सर्वच मरणार पण आपण कधी मरणार हे दिवस, तारखेसकट माहित असून जगणे किती कठीण असते ते त्याने नक्कीच अनुभवले होते. मरणाला सामोरे जायची कदाचित त्याची इच्छा नसेल किंवा ताकत ही नसेल म्हणूनच त्याने झोपेतच आपला मृत्यू यावा अशी नशिबाला विनंती केली असणार. नियतीने सुद्धा त्याला ह्या वेळेला दगा दिला नाही त्याची शेवटची इच्छा समजून त्याला त्रास न देता अलगद एक दिवस आधीच त्याला झोपेतच उचलून नेले.....कोणालाही नकळत.




DSCN2716-2



Post a Comment

2 Comments

  1. khup touching aani dolyat pani aananari katha. chaan lihili aahe tumhee, oghavatyaa bhaashet.

    ReplyDelete
  2. ब्लॉग आवडला.
    संपर्कासाठी ई-मेल मिळू शकेल का?

    ReplyDelete